पुण्यात मद्यधुंद चालकाकडून डीसीपींच्या वाहनाला जोरदार धडक

पुणे – शहरात अपघात आणि कायदा मोडणाऱ्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. काल (शनिवारी) रात्री असाच एक गंभीर अपघात केशवनगर परिसरात घडला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने वाहतूक विभागाचे उपआयुक्त (DCP) हिम्मत जाधव यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. रात्री १० ते १०:३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात जाधव यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालं असून, त्यांच्या मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, अपघातानंतर परिसरात काही वेळ प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक नागरिकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दारूच्या नशेत वाहन चालवत असलेल्या चालकाला आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, रक्तातील अल्कोहोलच्या पातळीची खातरजमा केली जात आहे. ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वाहनावरचा ताबा गमावल्यामुळे हा अपघात झाला. या घटनेमुळे पुण्यातील मद्यधुंद वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, शहरातील वाढती वाहतूक बेफिकिरी आणि मद्यधुंद वाहनचालकांविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अशा घटनांमुळे निष्पाप नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. पोलिसांकडून ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ विरोधात नियमित मोहिमा राबवण्यात येत असल्या तरी, अशा घटनांमध्ये घट होण्याऐवजी वाढ होत असल्याची चिंताजनक स्थिती आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.