पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा; आर्थिक संकटाची शक्यता
मुंबई (प्रतिनिधी) : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढत असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देश लवकरच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणार असून त्याचा सर्वाधिक फटका युवक, शेतकरी, कामगार आणि लघुउद्योजकांना बसेल, असा इशारा त्यांनी दिला.

रायबरेली दौऱ्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देशातील सध्याची आर्थिक व्यवस्था काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही व्यवस्था जास्त काळ टिकणार नाही आणि लवकरच देशाला मोठा आर्थिक धक्का बसू शकतो. जो आर्थिक झटका बसणार आहे त्याचा परिणाम उद्योगपतींवर होणार नाही, तर सामान्य नागरिकांवर होणार आहे.
राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांचा उल्लेख करत केंद्र सरकारची आर्थिक धोरणे काही निवडक उद्योगसमूहांना लाभदायक असल्याचा आरोप केला. या धोरणांचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेशातील युवक, शेतकरी, मजूर आणि छोट्या व्यावसायिकांना बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्वे दौऱ्याचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. सरकार लोकांना परदेश प्रवास कमी करण्याचा सल्ला देत आहे, मात्र पंतप्रधान स्वतः सातत्याने परदेश दौरे करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनीही पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून मोदी सरकारवर टीका केली. ही परिस्थिती सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे निर्माण झालेला संकटाचा भाग असल्याचं सांगत त्यांनी सर्वसामान्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोप केला.
अवघ्या चार दिवसात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात 91 पैशांनी तर डिझेलच्या दर 94 पैशांनी वाढ करण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईतील पेट्रोलच्या दर थेट 107.49 तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.02 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पुढील काळात इंधन दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




