कागलमध्ये राजमाता जिजाऊ बसचे स्वागत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बसचे पूजन
कागल (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कागल आगारामध्ये नव्यानेच "राजमाता जिजाऊ बस" दाखल झाल्या. एकूण ५६ आसन क्षमता असलेल्या या अद्यावत बसचे पूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या दोन बसेस कागल आगारामध्ये दाखल झाल्या.

यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सुरू केलेली "राजमाता जिजाऊ बससेवा" ही एक अत्याधुनिक व स्मार्ट अशी बससेवा आहे. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा व आरामदायी आसनांची रचना करण्यात आलेली आहे. सहाजिकच प्रवाशांचा प्रवास सुखकर व आरामदायी होणार आहे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, नवाज मुश्रीफ, कागल एस. टी. बस स्थानकाचे मॅनेजर संदीप पाटील, मारुती जोशी, अरुण लाड व एस. टी .कामगार संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.




