"प्रभू रामाने पित्यासाठी वनवास पत्करला, यांनी वडिलांचे विचारच सोडले"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
मुंबई: शिवसेनेचे (UBT) 'रामरक्षा आंदोलन' म्हणजे केवळ स्वतःच्या पक्षाच्या रक्षणाचा केविलवाणा प्रयत्न असल्याची घणाघाती टीका मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ज्यांनी सत्तेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि हिंदुत्वाच्या राजकारणाला स्वतःची चूक मानले, तेच आज राम आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारत आहेत, असा निशाणा त्यांनी साधला. तसेच, प्रभू श्रीरामांनी पित्याच्या वचनासाठी १४ वर्षांचा वनवास स्वीकारला; मात्र ज्यांनी स्वतःच्या वडिलांचे विचार आणि तत्त्वे अर्ध्या वाटेत सोडून दिले, त्यांना श्रीरामांच्या आदर्शांवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशा कडक शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच “गर्वाने सांगा, आम्ही हिंदू आहोत” हा मंत्र दिला. मात्र, आज इतक्या वर्षांनंतर उबाठा गटाला या घोषणेची आठवण झाली आहे. हिंदुत्व हे हवे तेव्हा बदलण्याचे कपडे नाहीत. त्यामुळे रामरक्षेची भाषा करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या पक्षाची आणि घसरलेल्या विचारसरणीची रक्षा करावी.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना शिंदे म्हणाले, "तुम्हाला जर खरोखरच 'रामरक्षा आंदोलन' करायचे होते, तर सर्वप्रथम तुमचे सहकारी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि अखिलेश यादव यांना त्याचे निमंत्रण द्यायला हवे होते. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करायचे होते. कारण, हेच विरोधक पूर्वी राम मंदिर कधी बांधणार? असा उपरोधिक सवाल विचारायचे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी झाली आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० देखील हटवण्यात आले. आज जर बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या या ऐतिहासिक निर्णयांचे जाहीर स्वागत केले असते. मात्र, उबाठाचे नेते आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानत आहेत, अशी टीका त्यांनी केली. २०१९ मध्ये सत्तेच्या हव्यासापोटी उबाठाने बाळासाहेबांच्या विचारांशी जी तडजोड केली, त्याचे चोख उत्तर महाराष्ट्रातील सुजाण जनतेने निवडणुकीत दिले असून त्यांना त्यांची खरी जागा दाखवून दिली आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले.




