प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, शिक्षिका झालीय अभिनेत्री

प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, शिक्षिका झालीय अभिनेत्री

मुंबई (प्रतिनिधी) : मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सहभागी होणारी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आजही लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. मराठी इंडस्ट्रीतली ही लाडकी अभिनेत्री या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रीय असणारी प्राजक्ता स्वतःबाबतचे सर्व अपडेट्स ती चाहत्यांशी थेट शेअर करत असते. प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगणा आहे. यासोबतच ती एक कवयित्री, उद्योजिका म्हणून नावारुपाला आली आहे, आता त्यासोबत प्राजक्तानं सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे की, ती आता शिक्षिका झाली आहे. 

प्राजक्ताची पोस्ट पाहून चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. प्राजक्ता शिक्षिका झाली असली तरीदेखील आता ती रुपेरी पडद्यावर दिसणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण, त्याच पोस्टमध्ये प्राजक्तानं लिहिलेल्या एका ओळीनं मात्र, चाहत्यांच्या जीवात जीव आलाय. प्राजक्ताच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

प्राजक्ता माळी म्हणाली की, "गुरूकृपेनं,आज अत्यंत आनंदानं सांगू इच्छिते की, मी आता 'आर्ट ऑफ लिव्हिंग' कोर्सची 'हॅपिनेस प्रोग्राम' शिक्षिका बनले आहे.गेले 15 दिवस मी शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर अत्यंत खडतर आणि सखोल प्रशिक्षण घेतलंय. फोनचा वापर नाही की, बाहेरचं जेवण नाही; पूर्णपणे स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याचा हा काळ होता.."

दररोज पहाटे केलेली 'पद्मसाधना'.ज्यांनी अनुभवली आहे, त्यांनाच या साधनेचं महत्त्व ठाऊक आहे. या प्रवासात अशा अनेक गोष्टी अनुभवल्या ज्या शब्दांत मांडणं फारच कठीण आहे. मी आता लवकरच शिकवायला सुरुवात करणार आहे, त्यामुळे संपर्कात राहा", अशा शब्दांत प्राजक्तानं ही खास बातमी चाहत्यांना दिली आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे, त्यासोबतच एक तळटीपही लिहिली आहे. त्यामध्ये प्राजक्तानं "अजिबात फिल्म इंडस्ट्री सोडून कुठेही जात नाहीय..", असं नमूद केलंय. याचाच अर्थ असं की, शिक्षिका म्हणून प्राजक्ता आयुष्याची नवी सुरुवात करत असली तरीही ती इंडस्ट्रीतही सक्रीय असणार आहे.