जपानमध्ये रजनीकांतच्या ‘वेट्टैयन’ चित्रपटाचा बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ

जपानमध्ये रजनीकांतच्या ‘वेट्टैयन’ चित्रपटाचा बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ

मुंबई - जपानमध्ये तमिळ चित्रपटांना नेहमीच विशेष स्थान मिळालं आहे, आणि त्याचा सुरुवात झाली होती रजनीकांत यांच्या ‘मुथु’ या चित्रपटापासून. या चित्रपटामुळे रजनीकांत यांना जपानमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली, जी आजही कायम आहे. त्यांच्या चित्रपटांना भारतातच नव्हे, तर परदेशातही नेहमीच भरभरून प्रेम मिळतं. विशेषतः जपानमध्ये ‘मुथु’, ‘दरबार’ आणि ‘एंथिरन’ या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. हीच परंपरा पुढे चालवत, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेट्टैयन’ या चित्रपटालाही जपानी प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल यांच्या दिग्दर्शनात आणि लायका प्रॉडक्शन्सच्या निर्मितीत तयार झालेला हा चित्रपट, नुकताच जपानमधील नामांकित मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर नंबर 1 स्थान पटकावलं.

या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटात रजनीकांत यांनी एस. पी. अथियान या मुख्य भूमिकेत काम केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी एका न्यायप्रिय न्यायाधीशाची, तर फहद फासिल, राणा डग्गुबाती, मंजू वारियर, तुषारा विजय, ऋतिका सिंग, किशोर आणि असल कोलार यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, रजनीकांत आणि फहद फासिल यांची भूमिका जपानी प्रेक्षकांना विशेष भावली आहे.

https://www.instagram.com/reel/DAD4EXGyaXg/?utm_source=ig_web_copy_link

सामाजिक विषयांना स्पर्श करणाऱ्या ‘वेट्टैयन’ ला भारतातही चांगला प्रतिसाद मिळाला होता, आणि आता जपानमध्येही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय, हे पाहून रजनीकांत यांची आंतरराष्ट्रीय लोकप्रियता पुन्हा अधोरेखित होते.