मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली 'ही' मागणी

मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली 'ही' मागणी

मुंबई - मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता इतर समाजांकडूनही आरक्षणासाठी मागण्या वाढू लागल्या आहेत. यामध्ये ओबीसी प्रवर्गातील बंजारा समाज आता अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करत आहे. या मागणीला चालना देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी बंजारा समाजाला ST प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याची ठाम मागणी केली आहे.

हैदराबाद गॅझेटियरचा आधार - 

मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे की, हैदराबाद गॅझेटियर 1920 मध्ये लांबडा/बंजारा (सुगळी) समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून करण्यात आला आहे. हे गॅझेटियर ऐतिहासिकदृष्ट्या आणि प्रशासकीयदृष्ट्या मोठे महत्त्वाचे दस्तावेज मानले जातात.

मंत्री मुंडेंच्या पत्रातील उल्लेखानुसार :

"The Lambada's, otherwise called Banjara's or Sugali's, are a large wandering tribe found in great numbers throughout the Hyderabad State, particularly in the districts bordering Berar and the Marathwada region. They are regarded as a distinct tribe, separate Hindu Castes."

या ऐतिहासिक उल्लेखाच्या आधारे त्यांनी बंजारा समाजाला आदिवासी म्हणून मान्यता देणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

मंत्री धनंजय मुंडेंनी सांगितले की, ज्या हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये बंजारा समाजाला ST प्रवर्गाचा दर्जा देण्यात आला आहे, त्याच आधारावर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजालाही ST प्रवर्गात समाविष्ट करावे. त्यांनी स्पष्ट केलं की, राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटियर अधिकृतपणे लागू केला असल्यामुळे, त्याचा फायदा केवळ मराठा समाजापुरता मर्यादित न ठेवता बंजारा समाजालाही मिळायला हवा.

मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे की, बंजारा समाज इतिहासदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आणि वंचित आहे. या समाजाला अनेक वर्षांपासून न्याय मिळालेला नाही. जर त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा दिला गेला, तर शिक्षण, नोकरी आणि राजकीय क्षेत्रात त्यांना समान संधी मिळू शकते.

"हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याचा ठोस निर्णय घेण्यात यावा आणि त्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा." अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.