फळबागांचे नुकसान; युगेंद्र पवारांचा सरकारला इशारा
पुणे (प्रतिनिधि) : सध्या राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. काही भागात उन्हाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे, तर काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, बारामती तालुक्यात देखील अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली. सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळं लवकरच आम्ही आंदोलन करणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितलं.

बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठा तडाखा दिला आहे. होळ, सदोबाचीवाडी, वडगाव निंबाळकर, निंबूतसह परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भाजीपाला पिकांसह फळबागा जमिनीवर आडव्या झाल्यात. यानंतर शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी होळ, सदोबाचीवाडी, वडगाव बुद्रुक यासह इतर परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधत युगेंद्र पवार यांनी एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला. सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही म्हणून लवकरच आम्ही आंदोलन करणार असल्याचे देखील युगेंद्र पवारांनी सांगितलं.




