भाजप आमदाराची भास्कर जाधवांना खुली ऑफर; "कोकणच्या विकासासाठी सत्तेत या", प्रमोद जठारांचे मोठे वक्तव्य

भाजप आमदाराची भास्कर जाधवांना खुली ऑफर; "कोकणच्या विकासासाठी सत्तेत या", प्रमोद जठारांचे मोठे वक्तव्य

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील राजकारणात पक्षांतराच्या चर्चांना वेग आला असतानाच आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण ठरले आहे भाजपचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांचे वक्तव्य.

चिपळूणमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमोद जठार आणि भास्कर जाधव एकाच मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना जठार यांनी भास्कर जाधव यांना अप्रत्यक्षपणे सत्तेत येण्याचे आवाहन केले.

"भास्कर जाधव हे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. कोकणच्या विकासासाठी त्यांची सत्तेत गरज आहे. त्यांच्या अनुभवाचा योग्य वापर व्हायला हवा," असे म्हणत जठार यांनी त्यांना खुली ऑफर दिली. तसेच, "त्यांना त्यांच्या पक्षात योग्य जबाबदारी मिळत नाही, विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नाही," अशी टिप्पणीही त्यांनी केली.

यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र वृक्षारोपण केले. त्यावर मिश्कील शैलीत बोलताना जठार म्हणाले, आज आम्ही एकच झाड लावलं आहे, ते भविष्यात चांगली फळं देईल.विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून शाब्दिक चकमक झाली होती. गुहागरमधील स्वच्छता अभियान आणि लोटे एमआयडीसीच्या मुद्द्यावर एकमेकांवर टीका करणारे जठार आणि जाधव आता एकाच व्यासपीठावर दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, प्रमोद जठार यांच्या या वक्तव्यानंतर भास्कर जाधव भविष्यात कोणती भूमिका घेणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.