भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 'या' क्रिकेटरला अचानक बाहेर काढलं
क्रिकेट न्यूज - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या विजयासह 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. एडिलेड येथे पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताला 2 विकेटने पराभव स्विकारावा लागला. आता 25 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे होणारा तिसरा सामना भारतासाठी प्रतिष्ठेचा ठरणार आहे, कारण मालिकेत व्हाईटवॉशचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, सिडनीतील निर्णायक सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन याला संघातून वगळण्यात आले असून तो आता शेफील्ड शिल्ड स्पर्धेत खेळणार आहे.

पर्थमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यापूर्वी त्याला वनडे संघात स्थान मिळाले होते, मात्र आता त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी न्यू साउथ वेल्सचा ऑलराऊंडर जॅक एडवर्ड्स याला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच मॅथ्यू कुहनेमन यालाही तिसऱ्या सामन्यासाठी संघात संधी मिळाली आहे. विकेटकीपर जोश इंग्लिसलाही शेवटच्या वनडेत खेळण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले. मात्र रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी भारताला सावरत 118 धावांची भागीदारी केली.
रोहितने 97 चेंडूंमध्ये 73 धावा (7 चौकार, 2 षटकार) तर अय्यरने 77 चेंडूंमध्ये 61 धावा केल्या. अक्षर पटेलने 44 धावा आणि हर्षित राणाने 24 धावा केल्या. अखेरीस भारताने 9 विकेट गमावून 264 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर 265 धावांचे लक्ष्य ठेवले.
ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात 46.2 षटकांत 8 विकेट्स गमावत हे आव्हान पूर्ण केले. त्यांच्या विजयात मॅथ्यू शॉर्टने महत्त्वाची भूमिका बजावत 74 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंह, हर्षित राणा, आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलिया आता मालिकेत 2 - 0 ने आघाडीवर असून, 25 ऑक्टोबर रोजी सिडनीत होणारा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.




