मराठी शाळाच घडविते संस्कारसंपन्न व गुणवंत पिढी - जि.प.अध्यक्षा शिल्पा खोत

मराठी शाळाच घडविते संस्कारसंपन्न व गुणवंत पिढी - जि.प.अध्यक्षा शिल्पा खोत

कागल (प्रतिनिधी): विद्या मंदिर नंद्याळ ता.कागल येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात लेझीम खेळ करत रथातून  नवागत मुलांना शाळेत आणले व विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत म्हणाल्या, “मराठी शाळा या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहेत. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये धाडस, प्रामाणिकपणा, शिस्त आणि सामाजिक मूल्ये अधिक प्रभावीपणे रुजतात. त्यामुळे पालकांनी प्राथमिक शिक्षणासाठी मराठी शाळांना प्राधान्य द्यावे.”

यावेळी त्यांनी विद्या मंदिर नंद्याळ शाळेने प्रवेशोत्सव, वृक्षारोपण, गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप, तसेच लोकसहभागातून शैक्षणिक सुविधा उभारण्याचा राबविलेला आदर्श उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगून शिक्षकांचे, शाळा व्यवस्थापन समिती,पालक व ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन केले.भविष्यातही शाळेची अशीच प्रगती होत राहो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

कार्यक्रमास शाहू साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे, केंद्रप्रमुख सदानंद पाटील, सरपंच मनीषा कांबळे, दत्तात्रय कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक पाटील, यांच्यासह सरिता कुणकेकर, भिकाजी कोराणे, राजेंद्र येजरे,आर. डी. पाटील, नामदेव कोराणे, दादासो पाटील, विकास अस्वले, तुकाराम फगरे, भाऊसो पाटील, वर्षा पाटील, अर्चना शिंदे, शुभांगी पाटील, रूपाली करगार, बाजीराव फगरे, स्नेहल कांबळे, बाबासो कोराणे, आनंदा येजरे, राजाराम लाडगावकर, अण्णासो आडेकर, सागर करडे, बाजीराव चव्हाण, बजरंग खतकर अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन शिक्षक संदीप शिंदे यांनी तर हणमंत कुंभार यांनी आभार व्यक्त केले.