"महायुतीत फूट" विधानावर शिंदे संतप्त; शिरसाटांना फोनवरून कडक समज

"महायुतीत फूट" विधानावर शिंदे संतप्त; शिरसाटांना फोनवरून कडक समज

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं चित्र आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. शिरसाट यांच्या या विधानामुळे महायुतीत खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संजय शिरसाट यांना थेट फोन करून कडक शब्दांत समज दिली असून, महायुतीत फूट पडेल असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटामध्ये अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना डावलून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे जात असल्याच्या चर्चांना एका व्हायरल पत्रामुळे उधाण आले होते. त्यातच सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले.

याच घडामोडींवर भाष्य करताना संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक दावा केला होता. "कोणाची काही चूक झाली या वादात्मक गोष्टी आहेत. अंतर्गत गोष्ट वेगळी, पक्षातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही लोकं आमच्या संपर्कात असून आमच्याशी बोलतात. कोणाच्या नेतृत्वात काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडला आहे हे नाकारता येत नाही, त्यांच्या पक्षात काय घडतंय हे काही दिवसांत कळेल," असे संजय शिरसाट यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.

संजय शिरसाट यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र आक्षेप घेतला. "संजय शिरसाट आमच्या पक्षावर कसे बोलू शकतात?" असा थेट सवाल त्यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांना विचारला. तसेच, "यापूर्वी समज दिल्यानंतरही शिरसाट पुन्हा राष्ट्रवादीवर भाष्य करत आहेत. यापुढे त्यांनी असे वक्तव्य केल्यास आम्ही त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करू," असा इशारा मुश्रीफ यांनी दिला होता. 

आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांना फोन करून कडक शब्दांत सुनावले आहे. महायुती संदर्भात करण्यात येत असलेली वक्तव्य थांबवा. महायुतीत फूट पडेल असे काही बोलू नका. आपल्या तिन्ही मित्रपक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवायचे आहे. त्यामुळे पुन्हा अशी वक्तव्ये करू नका, अशी समज एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांना दिली आहे.