मॉन्सूनच्या परतीला सुरुवात: महाराष्ट्रात पुढील ७२ तास वादळी पावसाचा इशारा

मॉन्सूनच्या परतीला सुरुवात: महाराष्ट्रात पुढील ७२ तास वादळी पावसाचा इशारा

 २२ जिल्ह्यांना हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता हवामान विभागाने (IMD) महत्त्वाचा इशारा दिला आहे. उन्हाचा तडाखा वाढत असतानाच राज्यात वादळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने पुढील ७२ तासांत राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना कोणता इशारा?

  • कोकण: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागासाठी पुढील ३ दिवसांचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
  • मराठवाडा: परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे.
  • मध्य महाराष्ट्र: नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • विदर्भ: अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

कमी दाबाचे क्षेत्र व हवामानातील बदल

पश्चिम राजस्थानमधून मॉन्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील दोन दिवसांत मॉन्सून परतण्यासाठी आणखी पोषक वातावरण तयार होत आहे. उत्तर अंदमान समुद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ही यंत्रणा वायव्येकडे सरकत असून, आगामी काळात ती आणखी तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

एल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण विषम राहिले आहे. कमी वेळेत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आधीच नुकसान झाले असताना पुन्हा वादळी पावसाचा इशारा आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामान विभागाने सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.