उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?; तुकाराम मुंढेंच मिश्किल उत्तर
मुंबई (प्रतिनिधी) : सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची राज्यासह देशभरात चर्चा आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त आणि अस्वच्छता असलेल्या हॉटेल्सवर कारवाई केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याचदरम्यान तुकाराम मुंढे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो, असा प्रश्न विचारण्यात आला.

मागील तीन-चार मुख्यमंत्री पाहिले तर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात तुम्हाला किमान अडीच वर्षे कुठेही पोस्टिंग देण्यात आली नव्हती. त्यामुळे या तिघांपैकी तुम्हाला कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?, असा सवाल तुकाराम मुंढे यांना करण्यात आला.
या प्रश्नावर तुकाराम मुंढे यांनीही मिश्किल अंदाजात उत्तर दिलं. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो, असं विचारल्यानंतर, मला वाटतं तुमचा रिसर्च जास्त चांगला वाटायला लागलाय, असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं.
तसंच, तुमच्यामुळे आता मला ते खरंच तपासावं लागेल की एवढं होतं की नाही. कदाचित असेल, मला माहिती नाही, मी काउंट केलेलं नाही, असंही तुकाराम मुंढे म्हणाले.
मात्र, हा विषय सध्या चर्चेचा नाही, असं सांगत त्यांनी आपल्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळाचा एक किस्साही सांगितला. माझ्या करिअरमधील पहिल्याच पोस्टिंगमध्ये माझा वेटिंग पिरियड होता. पहिल्या पोस्टिंगसाठीच मी वेटिंगवर होतो. तो का झाला, कसा झाला, याची मला माहिती नाही, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
वेटिंग पिरियडमध्ये राहणं ही चांगली गोष्ट नाही. माझ्यासाठीही नाही आणि शासनासाठीही चांगली नाही, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.




