राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस को - ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी रोहित बांदिवडेकर व उपाध्यक्षपदी सदानंद घाटगे

राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस को - ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी रोहित बांदिवडेकर व उपाध्यक्षपदी सदानंद घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस को - ऑपरेटिव्ह बँक शतकोत्तर वाटचाल करीत असून सदर बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची सभा कोल्हापूर शहरातील सहकारी संस्था उपनिबंधक डॉ. प्रिया दळणर यांच्या अध्यक्षतेखाली रोहित प्रकाश बांदिवडेकर यांची अध्यक्षपदी तर सदानंद वसंतराव घाटगे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश रामराव शिंदे यांनी सभाध्यक्षा डॉ. प्रिया दळणर, उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर यांची सर्व संचालकांना ओळख करुन दिली. त्यानंतर सभेला सुरुवात करुन सभाध्यक्षा डॉ. दळणर यांनी उपस्थित संचालकांना अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी बोलाविण्यात आलेल्या संचालक मंडळ सभेमध्ये निवड प्रक्रियेची माहिती सविस्तर सांगितली.

त्यानंतर बँकेचे संचालक रोहित प्रकाश बांदिवडेकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी संचालक रविंद्र वसंतराव पंदारे यांनी सुचविले त्यास संचालक मधुकर श्रीपती पाटील (एम. एस्.) यांनी अनुमोदन दिले. तसेच बँकेचे संचालक शशिकांत दिनकर तिवले यांनी उपाध्यक्षपदासाठी सदानंद वसंतराव घाटगे यांचे नाव सुचविले त्यास संचालक अतुल गणपतराव जाधव यांनी अनुमोदन दिले.

त्यानुसार सभाध्यक्षा डॉ. प्रिया दळणर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने अध्यक्षपदी रोहित प्रकाश बांदिवडेकर व उपाध्यक्षपदी सदानंद वसंतराव घाटगे यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे घोषित केले.

नूतन अध्यक्ष रोहित प्रकाश बांदिवडेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये सहकारी संचालकांनी व सभासदांनी जो विश्वास दाखविला आहे, तो सार्थ ठरविणार असल्याचे सांगितले. भविष्यात बँकेचे कार्यक्षेत्र वाढवून शाखा विस्तार करणार असलेचे नमूद केले. बँकेचे कामकाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणार असलेचे व बँकेमार्फत मोबाईल बँकिंग (UPI) सुविधा देणार असलेचे नमूद केले. बँकेच्या प्रगतीचा आलेख आणखीन उंचाविण्याकरीता सर्व संचालकांच्या समवेत कार्यरत रहाणार असल्याचंही ते म्हणाले. 

सहकार्य वृत्तीने सर्व संचालकांनी बिनविरोध निवड केलेबद्दल बँकेचे नुतन अध्यक्ष रोहित प्रकाश बांदिवडेकर व नुतन उपाध्यक्ष सदानंद वसंतराव घाटगे यांनी सर्व संचालकांनी सोपविलेल्या जबाबदारीचे सर्वतोपरी सार्थक करु असे मनोगत व्यक्त करुन उपस्थित सर्वांचे आभार मानले.

बँकेचे माजी अध्यक्ष मधुकर श्रीपती पाटील (एम.एस.) यांच्या हस्ते सभाध्यक्षा डॉ. प्रिया दळणर यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. नूतन अध्यक्ष रोहित प्रकाश बांदिवडेकर यांचा व नूतन उपाध्यक्ष सदानंद वसंतराव घाटगे यांचा सत्कार सभाध्यक्षा डॉ. प्रिया दळणर यांच्या हस्ते करण्यात आला. 

बँकेचे मावळते अध्यक्ष मधुकर श्रीपती पाटील (एम.एस्.) व मावळते उपाध्यक्ष अरविंद भिमराव आयरे यांचा सत्कार सभाध्यक्षा डॉ. प्रिया दळणर यांच्या हस्ते करण्यात आला. सदरच्या निवडीनंतर अनेक सभासद व हितचिंतकांनी उभय मान्यवरांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

यावेळी बँकेचे संचालक शशिकांत तिवले यांनी आभार मानले.

या निवडीवेळी बँकेचे संचालक रविंद्र पंदारे, शशिकांत तिवले, मधुकर पाटील (एम्.एस्.), अतुल जाधव, विलासराव कुरणे, रमेश घाटगे, अजित पाटील, संचालिका हेमा पाटील, मनुजा रेणके, संचालक संजय खोत, किशोर पोवार, अरविंद आयरे, प्रकाश पाटील व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे हे उपस्थित होते.