'राजर्षी शाहू पुरस्कार’ प्रदान सोहळा व 151 वा जयंती उत्सव 2025 - जिल्हाधिकारी अमोल येडगे

'राजर्षी शाहू पुरस्कार’ प्रदान सोहळा व 151 वा जयंती उत्सव 2025  - जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दरवर्षी 26 जून रोजी 'राजर्षी शाहू जयंती' साजरी केली जाते. शनिवार 21 जून ते बुधवार 25 जूनपर्यंत राजर्षी शाहू व्याख्यानमाला तसेच 26 जून रोजी सायं. 6 वाजता सन 2025 चा 'राजर्षी शाहू पुरस्कार' ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार असून या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी केले आहे.

गुरुवार 26 जून रोजी सकाळी 8 वाजता राजर्षी शाहू जन्मस्थळास भेट व राजर्षी शाहू प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण कार्यक्रम. सकाळी 8.30 वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व सायंकाळी 6 वाजता राजर्षी शाहू पुरस्कार 2025 प्रदान समारंभ होणार आहे.

151 वा राजर्षी शाहू जयंती उत्सव 2025 व्याख्यानमाला - 

शनिवार, 21 जून रोजी भारतीय संविधनाची निर्मिती प्रक्रिया आणि स्वरुप या विषयावर डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. भालबा विभूते, कोल्हापूर यांचे व्याख्यान.

रविवार, 22 जून रोजी भारतीय संविधान - मूलभूत अधिकार व कर्तव्ये या विषयावर डॉ. भारती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. श्रीरंजन आवटे, पुणे यांचे व्याख्यान.

सोमवार, 23 जून रोजी भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय विषयावर डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. राहूल कोसंबी, औरंगाबाद यांचे व्याख्यान.

मंगळवार, 24 जून रोजी भारतीय संविधान व संसदीय लोकशाही विषयावर डॉ. प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. श्रीराम पवार, कोल्हापूर यांचे व्याख्यान.

बुधवार, 25 जून रोजी भारतीय संविधान व न्यायव्यवस्था विषयावर डॉ. वसंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. प्रताप साळुंखे, मुंबई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सर्व व्याख्यानमाला 21 जून ते 25 जून 2025 या कालावधीत सायं. 6 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.