राज ठाकरेंच्या टीकेला राम कदमांचे प्रत्युत्तर; मुख्यमंत्र्यांनी दोन ओळी हिंदीत बोललं तर काय बिघडलं?
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पावर झालेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी हिंदीत केलेल्या वक्तव्यावर आणि "बघून घेऊ" या इशाऱ्यावर राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

याच टीकेला भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, "अमीर खानच्या लग्नाला गेल्यावर किती मराठीत बोललात? मग मुख्यमंत्र्यांनी भाषणात दोन ओळी हिंदीत बोललं तर काय बिघडलं? मराठीचा आदर आम्हालाही आहे."राम कदम यांनी पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांचाही उल्लेख केला. "देवेंद्रजींची ओळख 'इन्फ्रा मॅन' अशी झाली आहे. राज्यभर मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे विरोधक घाबरले असून टक्केवारीच्या आरोपांद्वारे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत," असा आरोप त्यांनी केला.
मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या घटनेबाबत बोलताना राम कदम म्हणाले की, "ही एक दुर्दैवी दुर्घटना होती. चांगल्या कामांची दखल घेतली जात नाही, मात्र एखादी त्रुटी झाली की त्यावरच राजकारण केलं जातं."दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानसभेतील हिंदीतील वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करत, "महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंदीत बोलण्याची गरज काय होती?" असा सवाल केला होता. तसेच, सरकारवर टीका केली की त्याला राजकारण म्हणणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




