रिलायन्सचा आधार मिळाला, पण पडझड रोखण्यात अपयश, ३० पैकी २५ शेअर्स लाल निशाणात
मुंबई (प्रतिनिधी) : मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग गडद झाल्याने जागतिक बाजारासह भारतीय शेअर बाजारातही सोमवारी भीषण पडझड पाहायला मिळाली. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावल्याने 'बीएसई' सेन्सेक्स १३५२.७४ अंकांनी (१.७१%) कोसळून ७७,५६६.१६ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा 'निफ्टी-५०' देखील ४२२.४० अंकांच्या (१.७३%) मोठ्या घसरणीसह २४,०२८.०५ वर स्थिरावला.

व्यवहारादरम्यान एका वेळी सेन्सेक्सने ७६,४२४.५५ आणि निफ्टीने २३,६९७.८० पर्यंतचा निचांक गाठला होता, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.बाजारातील घसरणीचा जोर इतका प्रचंड होता की, सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २५ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. केवळ ५ कंपन्यांनाच आपली मान वर काढता आली. निफ्टी-५० ची स्थितीही काही वेगळी नव्हती; तेथील ५० पैकी ४२ शेअर्स तोट्यात राहिले, तर केवळ ८ शेअर्सनी हिरवे निशाण राखले.
सर्वात जास्त वाढ : रिलायन्स इंडस्ट्रीज (१.३७%) ; सर्वात जास्त घसरण : अल्ट्राटेक सिमेंट (५.२३%)
युद्धाच्या परिस्थितीमुळे वाहन, बँकिंग आणि पोलाद क्षेत्रातील कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
वाहन उद्योग : मारुती सुझुकी (४.६८%) आणि महिंद्रा अँड महिंद्रा (४.३९%) यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली.
बँकिंग क्षेत्र : एसबीआय (३.९२%), कोटक बँक (३.४८%), आयसीआयसीआय बँक (२.७४%) आणि एचडीएफसी बँक (२.०९%) यांसारख्या दिग्गज बँकांचे शेअर्सही गडगडले.
इतर प्रमुख पडझड : इंडिगो (३.८३%), अदानी पोर्ट्स (३.७५%), टाटा स्टील (३.७५%) आणि एशियन पेंट्स (२.७५%) या कंपन्यांनीही गुंतवणूकदारांची निराशा केली.




