रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्याचा विशेष आराखडा तयार करा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्याचा विशेष आराखडा तयार करा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्याचा विशेष आराखडा तयार करुन कालबद्ध पध्दतीने अंबलबजावणी करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालायातील शाहू सभागृहात जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडील विविध विषयांबाबत आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. 

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP) व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) यांचे उदिष्ट्ये वाढविण्यावर भर द्यावा, जिल्हा उद्योग केंद्राना जे उदिष्ट्य दिले आहेत ती पूर्ण करुन अधिक उदिष्ट्ये करण्यासाठी पाठपुरावा करा, यासाठी विशेष शिबीरे आयोजित करुन उद्योजकांना चालना देण्यासाठी भर द्यावा. जिल्हा उद्योग केंद्रानी त्यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी विशेष अभियान राबवून नागरिकांपर्यत माहिती पोहोचण्यासाठी प्रचार व प्रसिध्दीचे नियोजन करा, उद्योग क्लस्टरबाबत बँकांनी प्रस्ताव करा, ज्या क्लस्टरांना मंजुरी दिली आहे, ती कार्यान्वित करण्याबाबत नियोजन करावे त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्रांनी सर्व बँकासोबत योग्य समन्वय ठेवून पतपुरवठा वेळेत होईल, याबाबत विशेष लक्ष देवून कामे करण्याबाबत त्यांनी योवळी सूचना दिल्या. 

यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, लीड बँकचे मंगेश पवार, संबधित अधिकारी व जिल्हा बँकेचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.