राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्राचे २६ जून रोजी आ. सतेज पाटील यांच्या हस्ते होणार प्रकाशन

राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्राचे २६ जून रोजी आ. सतेज पाटील यांच्या हस्ते होणार प्रकाशन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती वर्षाचे औचित्य साधून, प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित "राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र" या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार २६ जून रोजी त्यांच्या जन्मस्थळी लक्ष्मी-विलास पॅलेस येथे संपन्न होणार आहे. या प्रकाशन समारंभाचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते, मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत होणार असल्याची माहिती लेखक प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी दिली.

या पुस्तकात राजर्षी शाहू महाराजांच्या क्रांतिकारक, बहुआयामी आणि समाजप्रबोधनकारी कार्याचा विविध अंगांनी परामर्श घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा सी. डी. देशमुख उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. पवार यांनी या २१२ पृष्ठांच्या पुस्तकात एकूण ३७ अभ्यासपूर्ण प्रकरणांचा समावेश केला आहे.

पुस्तकातील काही महत्त्वाची प्रकरणे - 

-  जागतिकीकरणाचे पुरस्कर्ते

-  पेटंटनीतीतील दूरदृष्टी

-  बालविवाह प्रतिबंधक धोरण

-  अनाथ बालकांचे संगोपन

-  शेतकऱ्यांचे हितरक्षण

-  सहकार चळवळीचे बीज रोपण

-  सामाजिक क्रांतीचे प्रणेते

- उद्योग उभारणीचे द्रष्टेपण

प्रत्येक प्रकरणानंतर वाचकांच्या अभ्यासासाठी पुनरावलोकनात्मक २८८ प्रश्नांची प्रश्नावली देण्यात आली आहे, ही या पुस्तकाची विशेष बाब आहे.

प्राचार्य पवार म्हणाले, “राजर्षी शाहूंवर बरंच लेखन झालं असलं तरी अनेक पैलू अजूनही दुर्लक्षित आहेत. हे चरित्र त्या अपूर्णतेकडे लक्ष वेधणारे आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरेल.”

तरी सर्व शाहूप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांनी या प्रकाशन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लेखक प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी केले आहे.