विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; चार अल्पवयीन मुले लाटांमध्ये अडकली, दोघे बचावले तर दोघांचा शोध सुरू

विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; चार अल्पवयीन मुले लाटांमध्ये अडकली, दोघे बचावले तर दोघांचा शोध सुरू

मुंबई (प्रतिनिधी) : विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. नालासोपारा पश्चिमेतील 14 ते 17 वयोगटातील चार अल्पवयीन मुले समुद्रात उतरली असता ती लाटांमध्ये अडकली. यापैकी दोघांना पोलिस आणि होमगार्ड जवानांनी धाडसाने सुरक्षित बाहेर काढले, तर उर्वरित दोघांचा शोध अद्याप सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 9.45 वाजता किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी आणि होमगार्ड जवानांनी या मुलांना समुद्रात उतरू नये, अशी सूचना देत त्यांना परावृत्त केले होते. मात्र, पथक पुढे गेल्यानंतर ही मुले पुन्हा समुद्रात उतरली. काही वेळातच त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.

आरडाओरड ऐकताच पोलिस आणि होमगार्ड जवानांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेत दोन मुलांचे प्राण वाचवले. मात्र, समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे उर्वरित दोघे खोल पाण्यात वाहून गेल्याने ते बेपत्ता झाले.

दरम्यान, अर्नाळा समुद्रकिनारी 30 सप्टेंबरपर्यंत समुद्रात उतरण्यास बंदी आदेश लागू असून, याबाबतचे इशारे देणारे फलकही परिसरात लावण्यात आले आहेत. या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.सध्या जीवरक्षक, सर्च क्लब, अग्निशमन दल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाकडून बेपत्ता दोन्ही मुलांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.