शहरालगतच्या 11 ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेत बैठक संपन्न

शहरालगतच्या 11 ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेत बैठक संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरालगतच्या 11 ग्रामपंचायतीमधील घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सदरची बैठक प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व उप - आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये सहायक आयुक्त कृष्णा पाटील आणि मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी घेतली.

या बैठकीत शिंगणापूर, गांधीनगर, वडणगे, उजळाईवाडी, मोरेवाडी, वाडीपीर, पाचगाव, सरनोबतवाडी, गडमुडशिंगी, उंचगाव व कळंबा या 11 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामधील दैनंदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सुमारे 2 लाख 80 हजार लोकसंख्या, 35 हजार घरकुलं, 1200 व्यावसायिक आस्थापने, 80 शासकीय संस्था, 6 भाजी मंडई, 130 खाजगी आणि 9 सरकारी रुग्णालये आहेत. या सर्व घरगुती, शासकीय, व्यवसायिक व धार्मिक आस्थापनांचा दररोज 185 टन कचरा निर्माण होतो, त्यापैकी 125 टन कचरा टिप्पर आणि ट्रॅक्टरद्वारे संकलित केला जातो, तर उर्वरित 50 टन कचरा उघड्यावर टाकण्यात येतो. हा कचरा विशेषत: नदी, नाले, ओढे, तलाव यांच्या उघड्या पात्रात अथवा रस्त्याच्या कडेला टाकला जातो. यामुळे मोठया प्रमाणात आरोगयाच्या समस्या आणी हवा, पाणी, जमीन प्रदूषण होत असल्याचे ग्रामपंचायतीना यावेळी सांगण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापन नियमावली 2016 च्या तरतूदीनुसार या ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यरत नाहीत. या सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात अंदाजे 185 टन घनकचरा प्रक्रिया करण्यासाठी प्रतिदिन 200 टन क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प  राबविणे आवश्यक आहे. या गांवामधून आणी कोल्हापूर शहराच्या व संबंधीत गांवाच्या कार्यक्षेत्रात विशेषत: प्रवेश द्वाराजवळ अंदाजे 185 टन घनकचरा निर्माण व संकलित होतो. यासाठी शहरालगतची संबंधीत 4 गांवे व त्या गांवालगतचे कोल्हापूर शहरातील 8 ते 10 प्रभागांसाठी प्रत्येकी प्रतिदिन 50 टन क्षमतेचा एक प्रकल्प याप्रमाणे 4 प्रकल्प कोल्हापूर महानगरपालिका आणी संबंधीत ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात संयुक्तपणे राबवता येईल अशी संकल्पना मांडली. या सर्व गावांच्या शासकीय प्रतिनिधींनी त्यास सकारात्मकता यावेळी दर्शवली. तसेच अशा प्रकारे संयुक्त प्रकल्प राबविण्याचे ठरल्यास या प्रकरणी सर्व ग्रामपंचायती आणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय स्तरावरुन मान्यता घेऊन ही संकल्पना पुढे नेता येईल अशी चर्चा झाली.

हा संयुक्त प्रकल्प प्रत्यक्षात येईपर्यंत दररोजचा कचरा महापालिकेच्या प्रक्रिया प्रकल्पांवर स्वखर्चाने नेऊन प्रक्रिया करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी तयारी दर्शवली. त्यासाठी लागणारा खर्च आणि अंमलबजावणीबाबत परस्पर सामंजस्य करार करण्यावरही चर्चा झाली. यासाठी घनकचरा व्यवस्थापन नियमावली 2016 च्या तरतूदीनुसार या 11 ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी सद्यसिथीत संबंधीत ग्रामपंचायती व कोल्हापूर महानगरपालिकेकडे पुरेसा निधी? किंवा आर्थीक तरतूद उपलब्ध नसल्याने यासाठी संबंधीत प्राध्‍करणाच्या वरीष्ठ नियंत्रण आस्थापनेकडून व महाराष्ट्र प्रदूषणनियंत्रण मंडळ, महाराष्ट्र शासन आणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी या आस्थापनांकडून निधीसाठी संयुक्तरीत्या पाठपुरावा करता येईल अशी चर्चा झाली.  

तसेच या भागातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि भटक्या जनावरांची पकड व पांजरपोळमध्ये रवानगी या बाबतीतही चचा्र होऊन याबाबत ग्रामपंचायतींनी सकारात्मकता दर्शवली.

ग्रामपचंयातींनी दैंनदिन निर्माण होणारा घनकचरा व्यवस्थापनासाठी त्यांच्याकडे गायरान अथवा पडीक जागा उपलब्ध असल्याने आवश्यक निधी मिळाल्यास आणि संबंधित वरिष्ठ शासकीय प्राधिकरणांची मान्यता मिळाल्यास प्रकल्प राबवणे शक्य होईल, असे स्पष्ट करण्यात आले. यासाठी महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व ग्रामपंचायती आणि कोल्हापूर महानगरपालिका पुढील आठवड्यात संयुक्त प्रस्ताव वरिष्ठ प्राधिकरणाकडे सादर करणार आहेत. या बैठकीला  शिंगणापूर, गांधीनगर, वडणगे, उजळाईवाडी, मोरेवाडी, वाडीपीर, पाचगांव, सरनोबतवाडी, गडमुडशिंगी, उंचगाव व कळंबा या ग्रामपंचातीचे ग्रामसेवक व कर्मचारी उपस्थित होते.