शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'या' प्रसिद्ध एनर्जी ड्रिंकवर बंदी! मंत्री नरहरी झिरवाळांचे निर्देश!
मुंबई : तरुणाई आणि लहान मुलांमध्ये कमालीची क्रेझ असलेल्या 'स्टिंग' (Sting) या एनर्जी ड्रिंकवर आता राज्य सरकारने मोठी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. शाळांच्या ५०० मीटर परिसरात आता 'स्टिंग' एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी ३ जुलै रोजी विधानसभेत ही मोठी घोषणा केली.

भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत थेट स्टिंग पेयाच्या दोन बाटल्या सभागृहात आणून हा गंभीर मुद्दा उपस्थित केला आणि लहान मुलांसाठी हे पेय किती घातक आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले.
आमदार विक्रम पाचपुते यांनी आरोप केला की, अहिल्यानगरमधील श्रीगोंदा आणि पाथर्डी येथे ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या पेयांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवणारे कॅफिन, अतिप्रमाणातील साखर आणि ‘कार्मोजिन’ सारखे कृत्रिम रंग सर्रास वापरले जात आहेत. या पेयाच्या बाटलीवर ‘लहान मुलांसाठी शिफारस केलेली नाही’ असा स्पष्ट इशारा असतानाही, शाळा-कॉलेजच्या कॅन्टीन आणि परिसरात त्याची दारूपेक्षाही घातक पद्धतीने विक्री होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मंत्र्यांची मोठी घोषणा आणि कडक कारवाई
या चर्चेला उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, ज्या धर्तीवर शाळांच्या ५०० मीटर परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आहेत, त्याच धर्तीवर आता 'स्टिंग' एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवरही बंदी घालण्यात येईल आणि याचे आदेश तातडीने जारी केले जातील.
याशिवाय, भाजप आमदार राहुल कुल यांनी शाळा परिसरात 'फ्लेवर पाना'च्या नावाखाली अंमली पदार्थ आणि 'फ्लेवर मिल्क'च्या नावाखाली भेसळयुक्त दूध विकले जात असल्याचा मुद्दा उचलला. यावर बोलताना मंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, या गंभीर बाबींची दखल घेतली असून वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सध्या विशेष तपासणी आणि कडक कारवाईची मोहीम सुरू आहे.




