संजय दिना पाटील-शिंदे संपर्कावरून देशपांडेंचा दावा; ठाकरेंना आधीच इशारा

संजय दिना पाटील-शिंदे संपर्कावरून देशपांडेंचा दावा; ठाकरेंना आधीच इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप करत, खासदार संजय दिना पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आपण पूर्वीच उद्धव ठाकरे यांना दिली होती, असा दावा केला आहे.देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, भांडुप परिसरातील महापालिका निवडणुकीसाठी संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी सूचना त्यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वाला केली होती. त्या जागेसाठी मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांना संधी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली होती.

मात्र, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे राजुल पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. तसेच, संजय दिना पाटील भविष्यात पक्ष सोडू शकतात, असा इशाराही आपण दिला होता, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी पक्षांतराच्या राजकारणावर टीका करत, पूर्वी मनसेचे नगरसेवक शिवसेनेत गेले तेव्हा वेगळी भूमिका घेणारे नेते आता खासदारांच्या पक्षांतरावर आक्षेप घेत असल्याचे म्हटले. राज्यातील शेतकरी, बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आणि इतर जनतेच्या प्रश्नांऐवजी राजकीय पक्ष एकमेकांचे नेते फोडण्यात गुंतल्याची टीकाही त्यांनी केली.