सैनिक टाकळीत एमआयडीसीचा वाद पेटला ! आमदार यड्रावकरांची भूमिका संदिग्ध ; ग्रामस्थ आक्रमक

सैनिक टाकळीत एमआयडीसीचा वाद पेटला ! आमदार यड्रावकरांची भूमिका संदिग्ध ; ग्रामस्थ आक्रमक

शिरोळ /प्रतिनिधी : येथील तालुक्यातील ऐतिहासिक सैनिक परंपरा लाभलेल्या सैनिक टाकळी गावातील एमआयडीसीविरोधी आंदोलन आता आणखी तीव्र झालं आहे. आज ग्रामस्थांनी थेट आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र, या भेटीनंतर आमदारांच्या भूमिकेवर आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गावाच्या परंपरेला साजेसा विकास व्हावा आणि प्रस्तावित एमआयडीसी रद्द व्हावी, या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून ग्रामस्थांचा लढा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज गावातील माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर आणि मोठ्या संख्येने महिलांनी जयसिंगपूर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तिथून थेट आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर जात त्यांनी निवेदन दिले आणि आमदारांशी सविस्तर चर्चा केली.

या महत्त्वाच्या चर्चेदरम्यान आमदारांनी एमआयडीसी रद्द करण्याबाबत कोणतीही स्पष्ट किंवा ठोस भूमिका मांडली नाही, ज्यामुळे आंदोलकांमध्ये नाराजी पसरली. आमदारांनी थेट एमआयडीसी रद्द करण्याऐवजी गावकऱ्यांना सैनिक स्कूल, माजी सैनिकांसाठी हौसिंग सोसायटी, केंद्रीय विद्यालय, भरतीपूर्व प्रशिक्षण क्रीडांगण आणि कृषी महाविद्यालय यांसारख्या पर्यायी विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले. हे प्रस्ताव शासनाकडे पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, पण एमआयडीसी रद्द करण्याला पाठिंबा देणं टाळलं.

दुसरीकडे, काल झालेल्या रस्ता रोको आंदोलनानंतर आंदोलक महिला आणि ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. याप्रकरणी पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर आंदोलकांनी कडक शब्दांत टीका केली आहे.

आमदारांच्या सूचनेनुसार विकास आराखड्याचे प्रस्ताव देण्याचे गावकऱ्यांनी ठरवले असले, तरी जोपर्यंत प्रस्तावित एमआयडीसी पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत हा लढा अधिक आक्रमकपणे सुरूच राहील, असा निर्धार आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील आणि सैनिक टाकळीच्या ग्रामस्थांनी केला आहे.