स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये कोणत्या निवडणुका आधी होणार..?
मुंबई - प्रमुख विरोधी पक्षांनी मतदारयाद्यांतील त्रुटी दूर करूनच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली असली तरी, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. यापैकी कोणत्या निवडणुका प्रथम घेतल्या जाणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीच्या अखेरीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने आयोगाने हालचाली वेगात केल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी गट - गण रचना आणि आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी नगराध्यक्ष आरक्षण, प्रभाग रचना आणि प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. महापालिकांसाठी प्रभाग रचना निश्चित झाली असली, तरी आरक्षणाची घोषणा अद्याप बाकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याची शक्यता आहे. त्यातही नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका सर्वात आधी होऊ शकतात, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची चर्चा आहे. अखेरीस महापालिकांच्या निवडणुकांचा सामना होईल, असे संकेत आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षांनी मतदारयाद्यांतील चुकांकडे लक्ष वेधून त्या दुरुस्त न करता निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी कायम ठेवली आहे. तरीही, आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने, याच पार्श्वभूमीवर विरोधकांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




