१५ ऑगस्टला मांसविक्रीवर बंदी ; विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल

१५ ऑगस्टला मांसविक्रीवर बंदी ; विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल

मुंबई - देशात यंदा ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेअंतर्गत देशभरात देशभक्तीचे वातावरण आहे. मात्र, महाराष्ट्रात या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील काही महापालिकांनी १५ ऑगस्ट रोजी मांसविक्री आणि कत्तलखान्यांवर बंदी घातली असून, या निर्णयावरून राजकीय वाद तापलं असल्याचं पहायला मिळतं.

मांसबंदीवरून विरोधकांचा सरकारवर टीका - 

कल्याण - डोंबिवली महापालिकेने सर्वप्रथम १५ ऑगस्टला मांस व मटण विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला. त्यानंतर मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि जळगाव महापालिकांनीही अशाच स्वरूपाचे आदेश काढले. आदेशानुसार, १४ ऑगस्टच्या रात्री १२ वाजल्यापासून ते १५ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत कोणतीही कत्तल किंवा मांस विक्री करण्यात येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत कडक कारवाई होणार असल्याचेही आदेशात नमूद आहे.

सरकारच्या या निर्णयावर अनेक राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या बंदीला "दडपशाही" संबोधून सरकारवर टीका केली आहे.

मनसेचा तीव्र विरोध; आयुक्तांवर सवाल - 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ही सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मनसे पदाधिकारी मनोज घरत यांनी मीडियाशी बोलताना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निर्णयावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, “पालिका आयुक्तांच्या अभिनव आदेशाला आमचा तीव्र विरोध आहे. आयुक्त काही अभिनव पोल्ट्री फार्म उघडणार आहेत का?” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.