27 जून अखेर राष्ट्रीय महामार्ग क्र.166 कराड ते चिपळून मार्गावरील वाहतुकीत बदल

27 जून अखेर राष्ट्रीय महामार्ग क्र.166 कराड ते चिपळून मार्गावरील वाहतुकीत बदल

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे या कार्यालयामार्फत पाटण व कोयनानगर पोलीस ठाणे हद्दीतुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 ई वरील रुंदीकरणाचे काम प्रगतीत आहे. राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील बाजेगाव ते शिरळ या भागात अतिवृष्टीमुळे 16 जून 2025 रोजी मौजे वानेगाव येथील पर्यायी मार्ग हा पाण्याखाली गेला होता. हा पर्यायी रस्ता वाहून गेल्याने लगतच्या मुख्य रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपातील दुरुस्ती करण्यात आली असून 17 जून  रोजी सदर रस्ता हलक्या वाहनांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. या ठिकाणी रस्त्यावरील दुरुस्तीच्या कामा दरम्यान पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आणि साठत असलेल्या पाण्यामुळे मानकानुसार दबाई होऊ न शकल्याने रस्ता जड वाहनांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आलेला नाही. याचे काम पूर्ण होण्यासाठी,  27 जून पर्यंतचा कालावधी लागणार आहे. 

पाटण व कोयनानगर पोलीस ठाणे हद्दीतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 ई कराड ते चिपळून या राष्ट्रीय मार्गाच्या वाहतुकीत बदल करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त अधिकारान्वये 27 जून रोजी 12 वाजेपर्यंत अधिसुचना पारित केली आहे.

वाहतुक मार्गात खालीलप्रमाणे बदल करण्यात आले असून यामध्ये कराड व उंब्रज बाजूकडुन चिपळूण कडे जाणारी अवजड वाहतूक -

कराड व उंब्रज येथून सरळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 04 वरुन पाचवड फाटा उंडाळे-कोकरूड-मलकापुर- आंबा घाट- संगमेश्वर वरुन चिपळून कडे जाईल. चिपळुन कडुन कराड व उंब्रजकडे येणारी अवजड वाहतुक चिपळुन वरुन संगमेश्वर -आंबा घाट- मलकापुर- कोकरूड- उंडाळे-पाचवड फाटा -राष्ट्रीय महामार्ग क्र. 04 वरुन कराड, उंब्रज कड़े जाईल.

ज्या ज्या ठिकाणावरुन ही वाहतुक वळविण्यात आली आहे अशा सर्व ठिकाणी दिशा दर्शक फलक व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतुक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पोलीस अधीक्षक  दोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.