27 जून रोजी 1 हजार 470 रिक्त पदांचा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्हयातील बेरोजगार युवक युवतींसाठी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनअरींग ॲण्ड टेक्नोलॉजी, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या 100 दिवस कृती कार्यक्रम या उपक्रमाच्या आधारे कोल्हापूर जिल्हयातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
आयटीआयचे सीएनसी, व्हीएमसी इलेक्ट्रीशिअन, मशिनिष्ट, वेल्डर आदी एकूण 826 पदे, बीई/डिप्लोमाचे ऑपरेटर, जॉब इन्स्पेक्टर, मॅनटन्स, सुपवायजर 82 पदे, बीकॉम, बीएससी, बीए पदवीधारक प्रोडक्शन सुपरवायजर, सेल्स एक्जुक्युटीव, लेखापाल 89 पदे, किमान 8 पास हेल्पर, शिप्ट सुपरवायसर 473 पदे असे एकूण 1470 रिक्त पदांचा मेळावा होणार आहे.
या उपक्रमांतर्गत या रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील 28 खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून विविध प्रकारच्या 1 हजार 470 रिक्त पदे या मेळाव्याकरीता कळविण्यात आली आहेत. यासाठी किमान 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी, अभियांत्रिकी पदवी, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. रोजगार मेळाव्यासाठी सहभाग नोंदविण्यासाठी उमेदवारांनी QR कोड द्वारे उमेदवार नोंदणी करून पंडित दीनदयाल रोजगार मेळावा अंतर्गत आपल्या आवडीच्या आस्थापनेकडे सहभाग नोंदवावा.
यास्तव इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार बायोडाटाच्या 5 प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.