Buldhana Accident : कारला ट्रकची धडक ; तीन जणांचा जागीच मृत्यू , चार गंभीर जखमी

Buldhana Accident : कारला ट्रकची धडक ; तीन जणांचा जागीच मृत्यू , चार गंभीर जखमी

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून मृतदेह बाहेर काढण्यासाठी गाडीचा पत्रा कापावा लागला. जखमींना खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा ‘मृत्यूचा सापळा’

बुलढाण्याचा राष्ट्रीय महामार्ग नेहमीच धोकादायक मानला जातो. वळणं, सुसाट वेग आणि रॅश ड्रायविंगमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की, वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांना आणि जीवनरक्षकांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले. अद्याप मृत व जखमींची नावे समोर आलेली नाहीत.

दुचाकीस्वाराचा एस.टी. बसच्या धडकेत मृत्यू

दुसरीकडे, चिखली तालुक्यातील बोरगाव वसू फाट्याजवळ सोमठाणा परिसरात झालेल्या एका वेगळ्या अपघातात शिवशंकर प्रल्हाद भोपळे (वय ३८, रा. हनवतखेड) यांचा एसटी बसच्या धडकेने मृत्यू झाला. भोपळे हे आपल्या दुचाकीवरून चिखलीहून तेल्हारा गावाकडे जात होते. दरम्यान, मागून भरधाव आलेल्या एसटी बसने जोरात धडक दिल्याने ते रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत केली, मात्र घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांकडून तपास सुरू

या दोन्ही अपघातांच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे. चिखली पोलिसांनी फिर्यादी आनंद अर्जुन कुटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे आणि तपास पोलीस अधिकारी राजू सुसर करत आहेत.