आवाडे जनता सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्रदान
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा बँक्स असोसिएशनतर्फे २०२४ - २५ या आर्थिक वर्षासाठी ५०१ कोटींपेक्षा अधिक ठेवी असलेल्या सहकारी बँकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेला कोल्हापूर सर्वोत्कृष्ट बँक हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट बँक हा सन्मान असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे, उपाध्यक्ष विठ्ठल मोरे आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत बँकेचे उपाध्यक्ष सीए संजयकुमार अनिगोळ व संचालक सीए चंद्रकांत चौगुले यांनी स्वीकारला.
बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी यावेळी सांगितले की, “गेल्या सहा दशकांपासून आमची बँक पारदर्शक कारभार, सौहार्दपूर्ण सेवा, सर्वसामान्यांना आर्थिक आधार, उद्योग-उद्योजकांना सहाय्य आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या तुलनेत आमची बँकही ग्राहकांना सर्व आधुनिक सुविधा देण्यासाठी सज्ज आहे."
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, तसेच संचालक बंडोपंत लाड, रमेश पाटील, श्रीशैल कित्तूरे, महेश सातपुते, योगेश पाटील, सचिन देवरुखकर, बाबूराव पाटील, अविनाश कांबळे, शैलेश गोरे उपस्थित होते.




