कागल नगरपालिकेतील सत्तांतराचे नेतृत्व आता नारीशक्तीच्या हाती - राजे समरजितसिंह घाटगे

कागल नगरपालिकेतील सत्तांतराचे नेतृत्व आता नारीशक्तीच्या हाती  - राजे समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) - कागल नगरपालिकेतील सत्तांतराचे नेतृत्व आता नारीशक्तीच्या हाती असून या निवडणुकीत गटाच्या विजयासाठी महिला कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे,असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. कागल शहरात आयोजित महिला कार्यकर्त्यांच्या संवाद बैठाकीत घाटगे दांपत्याने महिलांशी संवाद साधला. यावेळी कागल शहरातील महिला उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले,कागल नगरपालिकेत आपला विजय निश्चित करण्यासाठी भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कारभार,शिस्त हेच आपले बळ आहे.कोणत्याही परिस्थितीत सत्तांतर घडवून आणायचे आहे.पुरुष कार्यकर्त्यांसोबतच महिलांनीही निवडणुकीमध्ये सहभागी होऊन  नेतृत्व करावे.महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा अधिक राहिला आहे. त्यामुळे महिलांचे सक्रिय योगदान हे या निवडणुकीतील निर्णायक घटक ठरणार आहेत.

यावेळी राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे म्हणाल्या, “राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. या माध्यमातून स्वावलंबन, कौशल्य विकास, लघुउद्योग प्रशिक्षण,बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता अशा अनेक क्षेत्रांत महिलांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे.नगरपालिकेत आपली सत्ता नसल्यामुळे अनेक योजना आणि उपक्रम राबविताना मर्यादा येतात. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिकेत आपली सत्ता असणे आवश्यक आहे.

या बैठकीत विविध प्रभागांतील महिला कार्यकर्त्यांनी निवडणुकीतील तयारी, मतदारांशी संपर्क आणि प्रचार नियोजन यावर आपली मते मांडली. बैठकीदरम्यान महिलांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाची लहर पाहायला मिळाली.