कागलमध्ये घाटगेंच्या बदल्यात घाटगे,भाजपची नवीन खेळी

कागलमध्ये घाटगेंच्या बदल्यात घाटगे,भाजपची नवीन खेळी

कोल्हापूर : कोल्हापूरच्या कागल मतदारसंघात भाजपने एक महत्त्वाची खेळी केली आहे. समरजीत सिंह घाटगे यांची भाजपमधून एक्झिट निश्चित झाल्यानंतर, संजय घाटगे आणि त्यांचे पुत्र अंबरीश घाटगे यांना भाजपमध्ये सामील करून घेण्यात आले आहे. मुंबईत "कमळ" हाती घेऊन त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला नव्याने सुरुवात केली आहे. संजय घाटगे  आणि त्यांचे पुत्र अंबरीश घाटगे यांना पक्षात  घेऊन भाजपने कागलमध्ये घाटगेंच्या बदल्यात घाटगे अशी राजकीय खेळी केली आहे. 

असा आहे 'संजय घाटगे' यांचा राजकीय प्रवास 

संजय घाटगे यांचा राजकीय प्रवास अनेक वळणांनी गेलेला आहे. शिवसेनेपासून सुरुवात करून काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ठाकरे गट आणि अखेर भाजपपर्यंत त्यांनी पक्ष बदलले आहेत. दरम्यान, त्यांनी हसन मुश्रीफ यांचा पराभव केला, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद मिळवलं, पण वादामुळे ते पद गमावलं. त्यांच्या बदलत्या भूमिका आणि युतींमुळे ते सातत्याने चर्चेत राहिले.

कागलमध्ये गटातटाचे राजकारण 

कागलमधील राजकारण व्यक्तिकेंद्रित गटांवर आधारित आहे. येथे भाजप अजूनही मजबूत स्थान मिळवू शकलेले नाही. सध्या हसन मुश्रीफ, समरजीत सिंह घाटगे आणि संजय मंडलिक हे तीन प्रमुख गट प्रभावशाली आहेत. संजय घाटगे यांचा गट तुलनेत कमकुवत असला तरी त्यांचे 'राजकीय उपद्रव मूल्य' लक्षात घेता, भाजपने त्यांच्यावर डाव खेळला आहे. मात्र 2019 मध्ये हा मतदारसंघ महायुतीच्या अंतर्गत मुश्रीफ यांच्यासाठी राखून ठेवावा लागला होता. त्यामुळे भविष्यात भाजपच्या रणनीतीत संजय घाटगे यांची भूमिका गुंतागुंतीची ठरू शकते.