कृषी पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत तळसंदेच्या 'डी. वाय. पाटील'चा डंका; दीपक शिंदे आणि प्रज्ञा भोसले महाराष्ट्रात प्रथम
कोल्हापूर /प्रतिनिधी : महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी पदव्युत्तर पदवी सामयिक प्रवेश पात्रता परीक्षेत (MCAER PG-CET) तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (बी. टेक ॲग्री.) आणि डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय (बी. एस्सी ॲग्री.) च्या विद्यार्थ्यांनी राज्यात दैदिप्यमान यश मिळवले आहे. दोन्ही विभागांमधून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावत यशाची परंपरा कायम राखली आहे.

दीपक शिंदे आणि प्रज्ञा भोसले राज्यात अव्वल
या परीक्षेत बी. टेक ॲग्री. विभागातून दीपक समाधान शिंदे याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. तर बी. एस्सी ॲग्री. विभागातील विद्यार्थिनी कु. प्रज्ञा मानसिंग भोसले हिनेही राज्यात प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.
गुणवत्ता यादीत डी. वाय. पाटीलच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व
राज्यातील पहिल्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये या महाविद्यालयाच्या तब्बल २० विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये:
· बी. टेक ॲग्री. विभाग: दिक्षा मगदूम (५ वा), युवराज परीट (११ वा), प्रणव पाटील (१५ वा), कुणाल ठावरे (१६ वा), वरुण पाटील (१७ वा), विशाल चव्हाण (३० वा), अभिषेक भुसाळ (३३ वा), सोहम मांडे (३६ वा) आणि संतोष हुलवान (३६ वा) यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
· बी. एस्सी ॲग्री. विभाग: अमेय बारटक्के (३ रा), श्रद्धा पाटील (८ वी), ऋतुजा मोरे (१४ वी), जयदत्त पठाडे (१६ वा) आणि धीरज पाटील (१८ वा) यांनी बाजी मारली.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ऋतुराज पाटील म्हणाले, "विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा संस्था उपलब्ध करून देईल."
नियमित मार्गदर्शन व सरावाचा फायदा
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले की, दोन्ही महाविद्यालयांनी राबवलेली नियमित मार्गदर्शन सत्रे, तज्ज्ञ प्राध्यापकांचे वैयक्तिक लक्ष आणि स्पर्धा परीक्षांच्या सराव चाचण्या या त्रिसूत्रीमुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले. आगामी काळातही स्पर्धा परीक्षा आणि संशोधनाभिमुख शिक्षणासाठी अधिक सक्षम वातावरण निर्माण केले जाईल.
या यशाबद्दल बी. टेक ॲग्री.चे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील आणि बी. एस्सी. ॲग्री.चे प्राचार्य डी. एन. शेलार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भविष्यातही यशाची ही परंपरा अशीच कायम ठेवण्याची ग्वाही दिली.
या सोहळ्याला उपप्राचार्य पी. डी. उके, प्रा. अमोल गाताडे, प्रा. आर. आर. पाटील यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने अभिनंदन
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.




