वाहतूक शाखेची मोठी कारवाई ; १३७ वाहनचालकांकडून २ लाखांचा दंड

वाहतूक शाखेची मोठी कारवाई ; १३७ वाहनचालकांकडून २ लाखांचा दंड

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर शहरातील शाळा आणि महाविद्यालय परिसरात अल्पवयीन तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक विभागाने मोठी मोहीम राबवून कडक कारवाई केली. अल्पवयीन वाहनधारक, विनालायसन्स वाहनचालक, तिब्बल सिट, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३७ वाहनचालकांवर कारवाई करत एकूण २,३२,५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

शहरातील विवेकानंद कॉलेज, महावीर कॉलेज, शहाजी कॉलेज, गोखले कॉलेज आणि न्यु कॉलेज अशा विविध महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी आणि तरुणांकडून वाहन चालविताना हुल्लडबाजी, तिब्बल सिट, भरधाव वेग, मोबाईल वापर, अस्ताव्यस्त पार्किंग, तसेच विनालायसन्स वाहनचालन वाढल्याची नोंद झाली होती. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार विशेष पथके तयार करून ही कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेतील अधिकारी आणि १८ पोलीस अंमलदार या मोहिमेत सहभागी झाले.

वाहतूक नियंत्रण शाखेने सर्व पालकांना आवाहन केले आहे की, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, कारण अपघातांची शक्यता गंभीर असते. तरुण वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सोबत ठेवाव्यात, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

ही संपूर्ण मोहीम अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, वाहतूक शाखेचे पो.नि. नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव, नागेश म्हात्रे आणि पोलीस अंमलदारांनी संयुक्तपणे पार पाडली.