कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील 'या' संशयितांना जामीन मंजूर
कोल्हापूर (प्रतिनिधी) - ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील उर्वरित तीन प्रमुख संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने आज निर्णय दिला.

या निर्णयामुळे आता या प्रकरणातील सर्व १२ संशयित आरोपी जामिनावर बाहेर आहेत. यापूर्वीच ९ संशयित आरोपींना जामीन मिळाला होता. उर्वरित तिघांना जामीन मिळाल्याने तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तपासाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१८ मध्ये कोल्हापूर न्यायालयाने डॉ. तावडे यांना जामीन मंजूर केला होता, परंतु त्यांना डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात जामीन न मिळाल्याने ते पुण्यातील कारागृहातच होते. १० मे २०२४ रोजी दाभोळकर प्रकरणात निर्दोष मुक्तता मिळाल्यानंतर ते कारागृहातून बाहेर आले. मात्र, १६ जुलै २०२४ रोजी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा पानसरे प्रकरणातील जामीन रद्द केला. अखेर १४ ऑक्टोबर २०२५ रोजी उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचनं त्यांना पुन्हा जामीन मंजूर केला. याआधी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भरत कुरणे, अमित बद्दी, वासुदेव सूर्यवंशी आणि समीर गायकवाड या संशयित आरोपींनाही जामीन मिळाला होता.
२० फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरात कॉ. गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) करण्यात आला. गेली अनेक वर्षे ही केस न्यायप्रविष्ट असून, मुख्य संशयित आरोपींना जामीन मिळाल्यामुळे आता या प्रकरणाची पुढील वाटचाल काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.




