कोल्हापुरात मुसळधार सुरूच ! पंचगंगा नदी २८ फुटांवर, जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली

कोल्हापुरात मुसळधार सुरूच ! पंचगंगा नदी २८ फुटांवर, जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीची  पातळी सध्या २८ फुटांवर पोहोचली आहे. अवघ्या 24 तासांत पंचगंगा नदीच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. जिल्ह्यातील  सर्वच  नद्या नाले  दुथडी वाहताना दिसत आहेत. 

सध्या पंचगंगा नदीची पातळी २८ फूट ३ इंचावर पोहोचली असून, खबरदारी म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट, तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ३१ बंधारे आधीच पाण्याखाली गेले असून, अनेक मार्गांवरील वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, मुख्य धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरण आता ३२ टक्के भरले आहे. धरणात सद्यस्थीला २. ५२ टीएमसी पाणीसाठा आहे. पावसाचा हाच जोर कायम राहिल्यास नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. तर पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल झाले असून शनिवारी एनडीआरएफ पथकाने बाजार भोगाव येथे  जनजागृती व बोट प्रशिक्षण देण्यात आले.