कसबा सांगाव येथे १ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण; प्रलंबित प्रश्नांवर लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

कसबा सांगाव येथे १ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण; प्रलंबित प्रश्नांवर लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

कसबा सांगाव (प्रतिनिधी): कसबा सांगावच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चेसाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्यात येईल. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गरज पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा करू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी संयुक्तपणे दिली.

कसबा सांगाव (ता. कागल) येथे पंधराव्या वित्त आयोग व ग्रामपंचायत निधीतून सुमारे एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ॲड. वीरश्री जाधव होत्या.

यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "कसबा सांगावमधील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सोलर सिस्टीम, जल जीवन मिशन, प्रॉपर्टी कार्ड आणि घनकचरा व्यवस्थापनासह इतर प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच कॅनॉलचे पाणी गावापर्यंत आणण्याचे नियोजन आहे."

राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, "आम्ही तीनही नेते एकत्र आल्यामुळे कागल मतदारसंघातील विकासकामांना मोठी गती मिळणार आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी गट-तट बाजूला ठेवून एकत्र यावे. ग्रामपंचायतीच्या चांगल्या नियोजनाला युतीचे नेते निधी कमी पडू देणार नाहीत."

यावेळी सुकन्या समृद्धी योजनेतील मदतीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील, उपसभापती इंद्रजीत पाटील, उपसरपंच रेखा आवळे, सुदर्शन मजले, विनोद आवळे, अमर कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

८५ वर्षांवरील ज्येष्ठांना दरमहा ५०० रुपये; अंत्यविधी अनुदानातही वाढ
अध्यक्षीय भाषणात सरपंच ॲड. वीरश्री जाधव यांनी ग्रामपंचायतीच्या महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. येत्या १५ ऑगस्टपासून गावातील ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ५०० रुपये आर्थिक मदत दिली जाईल. तसेच मागासवर्गीय व सर्वसाधारण नागरिकांसाठीचे अंत्यविधी अनुदान वाढवून ते थेट २,००० रुपये करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.