न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये 'डी फार्मसी' प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरू; १५ जुलैपर्यंत मुदत
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित, उचगाव येथील 'न्यू कॉलेज ऑफ फार्मसी' आणि शिवाजी पेठ येथील 'न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी'मध्ये डिप्लोमा इन फार्मसी (डी. फार्म) प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाचे अधिकृत सुविधा केंद्र (FC Center) सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि प्रवेशाबाबतचे सर्व मार्गदर्शन पूर्णपणे निःशुल्क (मोफत) दिले जाणार आहे.

सध्या डिप्लोमा इन फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, ऑनलाईन अर्ज नोंदणी व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जांची आणि कागदपत्रांची पडताळणी व पुष्टीकरण (Verification) याच अधिकृत सुविधा केंद्रावर केले जाईल.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक :
- १५ जुलै: ऑनलाईन अर्ज व कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीख.
- १७ जुलै: प्राथमिक गुणवत्ता यादी (Provisional Merit List) प्रसिद्ध होणार.
- १८ ते २० जुलै: यादीवर हरकती नोंदवण्याचा कालावधी.
- २१ जुलै: अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.
प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करणे आणि विविध कॅप राउंड्स (Cap Rounds) बद्दल अचूक माहिती देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी सहज उपलब्ध करून देणे, हा या सुविधा केंद्राचा मुख्य उद्देश आहे. या केंद्रावर प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कशी मिळवावीत, याचेही मार्गदर्शन केले जात आहे.
डी. फार्मसी प्रवेशासाठी इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, विकास अधिकारी डॉ. संजय दाभोळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांनी केले आहे.




