क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात ; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात ; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

मुंबई - क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी अडचणी वाढल्या असून त्यांचं मंत्रिपद पुन्हा एकदा धोक्यात आलं आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता असून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांच्यावरील शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायालयानं मंत्रीमाणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे दोघांनाही कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सध्या कोकाटे बंधू संपर्कात नसून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. प्रथम वर्ग न्यायालयानं दिलेली ही शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवत अटकेचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निकालाची प्रत विधिमंडळाला प्राप्त झाल्यानंतर कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

मंत्री कोकाटे सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी आपोआप रद्द होते, त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद दोन्ही धोक्यात आले आहे.

१९९५ सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात मंत्री कोकाटे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. मुख्यमंत्री कोट्यातील १० टक्के राखीव सदनिका कमी दरात मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याचा आरोप आहे. मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांनी अल्प उत्पन्न गटात असल्याचे आणि शहरात स्वतःचे घर नसल्याचे खोटे दाखवून नाशिकमधील उच्चभ्रू भागात दोन सदनिका मिळवल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून १९९७ मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात एकूण चार आरोपी असून त्यात मंत्री माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू आणि अन्य दोन जणांचा समावेश आहे.