ग्रामीण पत्रकारांना काय मिळते ? यापेक्षा समाजाला चांगले विचार व दिशा देण्याचे कार्य - विश्वनाथ मोरे

ग्रामीण पत्रकारांना काय मिळते ? यापेक्षा समाजाला चांगले विचार व दिशा देण्याचे कार्य - विश्वनाथ मोरे

करवीर (प्रतिनिधी) - गणेशवाडी तालुका करवीर येथील शिवाजी विद्यानिकेतन येथे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट वेलफेअर असोसिएशन करवीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील पत्रकाराला काय मिळते ? यापेक्षा समाजाला चांगले विचार व दिशा देण्यासाठी पत्रकार बंधूंच्या समवेत कार्य करत असल्याचे प्रतिपादन करवीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वनाथ मोरे यांनी यावेळी केले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

करवीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वनाथ मोरे पुढे म्हणाले, पत्रकार म्हणून कार्य करताना सत्याला सत्य बोलणे व खोट्याला खोटे सांगणे यासाठी निर्भीडपणे कार्य करताना येणाऱ्या अडचणी व समोर निर्माण होणारे परिस्थिती या सर्व बाबींचा ताळमेळ राखून कार्य करावे लागते. काही वेळेला या निर्भिडपणामुळे जवळची माणसे सुद्धा दुरावतात तेव्हा चौथा स्तंभ या नात्याने न डगमगता कार्य करावे लागते. पण समाजासाठी केलेल्या कार्याचे एक वेगळेच समाधान असते, ते कोणत्याही मानधन किंवा अमिषापेक्षा खूप वेगळे असल्याचेही मोरे यांनी सांगितले. 

शिवाजी विद्यानिकेतन सर्व विद्यार्थ्यांनी पत्रकारांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. संस्थापक नामदेव यादव व सचिव अनिता यादव, मुख्याध्यापक ज्ञानदेव यादव यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट पत्रकार म्हणून दैनिक तरुण भारत संवादचे सडोली खालसा पत्रकार बाजीराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक नामदेव माने यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य व इतिहास तसेच पत्रकार यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक ज्ञानदेव यादव, स्वागत संस्थापक नामदेव यादव यांनी केले तर आभार शिक्षक संपत पाटील यांनी मानले. 

या कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यानिकेतन गणेश वाडीचे संस्थापक अध्यक्ष नामदेव यादव, सचिव अनिता यादव, मुख्याध्यापक ज्ञानदेव यादव, कोजीमाशी पतसंस्थेचे उपाध्यक्ष व दैनिक लोकमतचे पत्रकार शिवाजीराव लोंढे, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सदस्य डॉ. निवास वरपे करवीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वनाथ मोरे, उपाध्यक्ष उत्तम नलवडे, पत्रकार रामचंद्र रोटे, दशरथ पाटील,बाजीराव पाटील, सरदार पाटील, राम पाटील व विद्यार्थी, विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.