दिव्यांगांच्या उन्नतीसाठी मंत्री हसन मुश्रीफ व आम्ही संयुक्तपणे कटिबद्ध-राजे समरजितसिंह घाटगे

दिव्यांगांच्या उन्नतीसाठी मंत्री हसन मुश्रीफ व आम्ही संयुक्तपणे कटिबद्ध-राजे समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करण्यासह त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि आम्ही नगरपालिकेसह शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहोत,असे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.कागल नगरपालिकेमार्फत आयोजित दिव्यांग कल्याण निधी व साहित्य वाटप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी २७६ दिव्यांग लाभार्थ्यांना अपंग कल्याण निधीतून धनादेश व आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले,कागल संस्थानच्या राजमाता विजयादेवी राणीसाहेब आणि सहकारमहर्षी स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांचा हेल्पर्स संस्थेच्या उभारणीत  सक्रिय सहभाग होता.तसेच आईसाहेब सुहासिनीदेवी घाटगे यांनी ‘आधार’ संस्थेद्वारे दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी उल्लेखनीय कार्य केले.दिव्यांग कल्याणाचा हाच वारसा पुढे चालविताना राजे बँक व जिल्हा बँकेच्या माध्यमातून शासनाच्या  योजनांचा लाभ देऊन दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करू,अशी ग्वाही त्यांनी दिली.

‘साहस’ संस्थेच्या संस्थापिका नसीमा हुरजूक यांनी दिव्यांगांनी आत्मविश्वासाने जगावे. शासनाने दिव्यांगासाठीच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी. हेल्पर्सच्या डॉ. सोनाली नवांगुळ यांनी शिक्षण व कौशल्य विकासावर भर देत समाजाने दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, तसेच नगरसेवक प्रकाश गाडेकर, अमित पिष्टे, स्वरुपा जकाते, तृशा कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी गटनेता दीपक मगर, सतीश घाटगे, संजय गाधी, निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, सर्व नगरसेवक-नगरसेविका व मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते.कागल नगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करण्यात येणार असून त्यांच्या सोयीसाठी विरंगुळा केंद्र व स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात येणार असल्याची घोषणा नगराध्यक्षा सविता माने व उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी केली.