पवारांविरोधात लढणार नाही, देशसेवेसाठी दुसरा मतदारसंघ – सुप्रिया सुळे यांची घोषणा
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. विधानपरिषदेच्या निमित्तानं महाविकास आघाडीत झालेल्या घडामोडी आणि त्यासंदर्भात झालेलं राजकारण बोलताना सुप्रिया सुळे यांनी मविआ संविधान वाचवण्यासाठी एकत्रित आल्याचं म्हटलं. याशिवाय बारामतीत गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची पवार आडनावाची नातवंडं आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की माझं काल रात्रीच उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं होतं, उद्धव ठाकरे यांचा काल शरद पवार यांना फोन आला होता. जयंत पाटील यांच्याशी देखील बोलणं झालं होतं आणि कालच आम्हाला हे कळलं होतं. मीही काल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलले होते. आता एका मताने महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे विधान परिषदेवर जात आहेत.
खरंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा चालली होती .हर्षवर्धन सपकाळ मगाशीच सविस्तर बोलले आहेत. आता वेगळं काय बोलायची गरज वाटत नाही. मी असं काही बघत नाही, पवार साहेबांची देखील बिनविरोध निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाने बिनविरोध का दिला? शिंदेंच्या शिवसेनेने बिनविरोध का दिला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
महाविकास आघाडी एका विश्वासाच्या प्रेमाच्या नात्यानं संविधान वाचवण्यासाठी एकत्रित आलेली आहे. समंजस पद्धतीने तिन्ही पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी काम करत आहेत, त्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात त्यापेक्षा जास्त काही नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.




