ठाकरे बंधूंच्या युतीचे संकेत ; जागावाटपावर चर्चा सुरू
मुंबई - महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष (भाजप) तयारीला लागली असली, तरी सध्या राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढण्याची. काही दिवसांपूर्वी खा. संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना “बात बहुत दूरतक गयी है…” अशा शब्दांत सूचक इशारा दिला होता. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आणि उद्धव ठाकरे गटातील युती जवळपास निश्चित झाली असून, जागावाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे.

दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेते एकत्र बसून जागावाटपावर सविस्तर चर्चा करत असून, निवडणूक आयोगाकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर होताच युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई महापालिकेवर नियंत्रण राखण्यासाठी महायुतीविरोधात ठाकरे बंधूंच्या युतीमुळे राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा गटातर्फे वरुण सरदेसाई, अनिल परब आणि सूरज चव्हाण हे नेते प्रमुख भूमिका बजावतील. ठाण्यात केदार दिघे आणि राजन विचारे, तर पुण्यात आदित्य शिरोडकर व वसंत मोरे यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली आहे. मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर यांच्यावर चर्चा आणि समन्वयाची जबाबदारी असेल.
सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, या संभाव्य युतीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चाही समावेश होण्याची शक्यता आहे. राऊत आणि पवार यांची अलीकडील भेट या चर्चांना अधिक बळ देणारी ठरली आहे. त्यामुळे या युतीचा तिसरा घटक म्हणून राष्ट्रवादीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
13 ऑक्टोबर रोजी ठाण्यात शिवसेना (UBT) आणि मनसे एकत्र मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या निमित्ताने दोन्ही पक्ष प्रत्यक्ष एकत्र येणार असल्याने युतीच्या चर्चांना गती मिळाली आहे.




