पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रावर भाजपचा फोकस, क्लीन स्वीप मोहिमेची तयारी
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या 15 वर्षांमध्ये पश्चिम बंगालमध्ये जंगजंग पछाडूनही यश न मिळालेल्या भाजपला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक असे यश मिळाले आहे. 2016 आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) शह देण्यासाठी साम-दाम-दंड-भेद अशा सर्व मार्गांचा वापर केला होता. मात्र, ममता बॅनर्जी यांनी या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपची डाळ शिजून दिली नव्हती. मात्र, पश्चिम बंगालमधील यंदाची विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी गेमचेंजर दिली होती.
भाजपने या निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला. तर गेली 15 वर्षे सत्तेत असलेला तृणमूल काँग्रेसला 100 जागांचा आकडाही गाठता आला नाही. भाजपच्या या यशात अनेक घटक कारणीभूत असले तरी निवडणूक आयोगाची विशेष मतदार पुनरावलोकन (SIR) मोहीम ही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावर खऱ्या अर्थाने प्रभाव टाकणारी ठरली. या मोहीमेतंर्गत तब्बल 90 लाख मतदारांची नावे यादीतून हटवण्यात आली होती. यापैकी मोजक्याच मतदारांना पुन्हा अर्ज केल्यानंतर यादीत समाविष्ट करुन घेण्यात आले. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाची ही एसआरआय मोहीम एकप्रकारे पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी फलदायी ठरली. त्यामुळे आता भाजप महाराष्ट्रातही हेच धोरण राबवण्याच्या तयारीत आहे.
पश्चिम बंगाल काबीज केल्यानंतर महाराष्ट्रातदेखील एसआयआरवर भाजपकडून भर देण्यात येणार आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि नेते आज एसआयआरचे धडे गिरवणार आहेत. भाजपकडून एसआयआर संदर्भात दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात बुधवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एसआयआर संदर्भात कार्यशाळेचे आयोजन आले आहे.




