पिराजीराव घाटगे ट्रस्टच्या वतीने 'या' स्पर्धेसाठी निवड झालेल्या जलतरणपटूंचा सत्कार
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर येथे पिराजीराव घाटगे ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झालेल्या जलतरणपटूंचा सत्कार केला. ज्येष्ठ समाजसेविका आणि आदर्श शिक्षिका सरोज पाटील (माई) आणि ट्रस्टचे विश्वस्त राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांच्या हस्ते हे सत्कार केले.

यामध्ये रुद्र सौरभ मनाडे याची दुबई येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप सागरी जलतरण स्पर्धेसाठी तर शौर्य स्वप्नील खोंद्रे याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी आणि वेदिका दीपक जाधव हिची अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बायथले ( रन स्विम रन) स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा भवानी जलतरण तलाव येथे हा सत्कार समारंभ झाला.
सरोज पाटील म्हणाल्या,खेळाडूंनी व्यसनापासून दूर राहून खेळावर लक्ष केंद्रित करून उंच ध्येय गाठण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. गेल्या सत्तर वर्षांपासून पिराजीराव घाटगे फिजिकल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट आजतागायत कोणत्याही शासकीय मदतीशिवाय शारीरिक शिक्षणामध्ये नि:स्वार्थीपणे करीत असलेल्या भरीव कामगिरीमुळे या तलावातील अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्याबद्दल ट्रस्टचे चेअरमन समरजितसिंह घाटगे, विश्वस्त प्रवीणसिंह घाटगे, जयेंद्रसिंह घाटगे आणि वीरेंद्रसिंह घाटगे यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. यापुढील काळातसुद्धा हे कार्य असेच चालू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ट्रस्टचे चीफ एक्झिक्युटिव्ह सुभेदार शिवाजी पाटील (निवृत्त), व्यवस्थापक सुभेदार श्रीकांत पाटील(निवृत्त), प्रशिक्षक विजय मांगलेकर, भक्ती पाटील, अवधूत परुळेकर, जीवरक्षक, सर्व कर्मचारी, जलतरणपटू आणि पालक उपस्थित होते.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्यांना ट्रस्टमार्फत वर्षभर मोफत प्रशिक्षण
ट्रस्टचे विश्वस्त राजे वीरेंद्रसिंह घाटगे म्हणाले, विविध खेळांमध्ये प्राविण्य संपादन करणाऱ्या खेळाडूंना नोकरीमध्ये अनेक संधी उपल्बध आहेत.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ट्रस्टमार्फत एक वर्ष मोफत प्रशिक्षण देण्याची घोषणा करत ट्रस्टमार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा उदयोन्मुख खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.




