मतदार यादीतील घोळाबाबत राजे समरजितसिंह घाटगे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कागल नगर परिषदेची सर्व प्रभागांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. या यादीमध्ये अनेक चुका निदर्शनास आलेल्या आहेत. यामध्ये ३४२ मतदारांची नावे गायब होणे,८२२ नावे दुबार,४५८ मयत मतदार नावे वगळली नाहीत.एकाच घरात अनेक नावे,काही बूथवर वाढ झालेल्या मतदारांची नोंद, प्रभाग क्रमांक ११ व ९ मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवार दिलेले नाहीत.अशा अनेक गंभीर त्रुटी आहेत. प्रशासन पातळीवर शासनाने नियुक्त केलेले बीएलओ यांची सदरच्या यादी बिनचूक करण्याची जबाबदारी आहे. मात्र त्यांच्याकडून ही प्रक्रिया गांभीर्याने करण्यात आलेली नाही. काही बीएलओ यांनी अतिशय चांगले काम केले आहे.मात्र कामचुकार बीएलओंच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.या कामचुकार बीएलओंसह मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करावी व नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सदोष मतदार यादी तात्काळ दुरुस्त करून नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे कागल शहरातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाचा भेटून निवेदनाद्वारे केली. याविषयी न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी येडगे यांनी याबाबत संबंधितांना यामधील दुरुस्तीबाबत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आदेश देऊ असे सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, प्रभागानुसार प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत प्रभाग क्रमांक दहामधील ३४२ मतदारांची नावे गायब दिसतात.ती नावे इतर कोणत्याही प्रभागात दिसून येत नाहीत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केलेली आहे. ती जर केली नसती तर राज्यघटनेने या नागरिकांना लोकशाहीमध्ये दिलेल्या मताच्या पवित्र अधिकारापासून हे नागरिक वंचित राहिले असते.
शहरामध्ये एकूण २८ हजार ४१३ इतके मतदार आहेत. यामध्ये एक ते अकरा या प्रभागातील मतदार यादीत एकूण ८२२ नावे दुबार आढळून आली आहेत. तसेच सर्व प्रभागांमध्ये एकूण ४५८ इतक्या मयत मतदारांची नावे वगळण्यात आलेली नाहीत. तसेच प्रभाग क्रमांक ९ मध्ये घर नंबर १७१ या एकाच घरात तब्बल ३६ मतदार नोंद असल्याचे दिसते. या घरात बी एल ओ यांनी इतकी नावे कशी नोंद केली. याचे आश्चर्य वाटते. व हा प्रभाग मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा लाडका प्रभाग आहे का? असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
प्रभाग क्रमांक ११ बाबत ते म्हणाले हा प्रभाग ३ उमेदवारांचा आहे. त्या प्रभागाचे मतदार २३८८ इतके आहेत. तर प्रभाग क्रमांक ९ हा दोन उमेदवारांचा आहे. आणि त्या प्रभागाची मतदार संख्या ३७९२ इतकी आहे. मग प्रभागाच्या लोकसंख्येत इतकी तफावत कशी? की तसेच प्रभाग क्रमांक दोनच्या मूळ प्रारूप मतदार यादी मध्ये पान क्रमांक १२४ मध्ये अनुक्रमांक २४९५,२४९८,२५०० आणि २५०३ या चार अनुक्रमांकवर एकाच व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये आहे. मतदार व्यक्ती एकच असून त्याचे मतदान ओळखपत्र मात्र वेगवेगळे आहेत.
प्रभागानुसार प्रसिद्ध झालेल्या मतदार यादी मध्येअसलेल्या चुका निवडणुकीपूर्वी तात्काळ दुरुस्त करून नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी शाहूचे संचालक रमेश माळी, सतीश पाटील, गोकुळचे माजी संचालक अजितसिंह घाटगे राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत, माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब हुच्चे, माजी उपनगराध्यक्ष संजय कदम,आनंदा पसारे, मारुती मदारे, आप्पासाहेब भोसले,नंदकुमार माळकर, राजे बँकेचे संचालक रणजीत पाटील,अरुण गुरव, दीपक मगर, सुशांत कालेकर, प्रवीण कुराडे,जयवंत रावण, विवेक कुलकर्णी,राजेंद्र जाधव,प्रमोद कदम,बाळू हेगडे, सुनील गाडेकर, प्रवीण सोनुले,रुपेश वाघमारे, अभिजीत कांबळे, असिफ मकानदार, पप्पू कुंभार आदी उपस्थित होते.




