मराठी भाषा असेपर्यंत मृत्युंजय वाचकप्रिय राहिल - जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर (प्रतिनिधी) - जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत कर्णकथा सांगणारी मृत्युंजय कादंबरी वाचकप्रिय राहिल अशा भावना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केल्या. ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतीदिनी अक्षर दालन येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात गुरूवारी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या मान्यवरांच्यासह उपस्थितांनी सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन केले. रवींद्रनाथ जोशी आणि अमेय जोशी यांनी सर्वांचे स्वागत केले.

प्रास्ताविकात समीर देशपांडे म्हणाले, आजऱ्यासारख्या गावात कोणतीही साहित्यीक परंपरा नसलेल्या घरामध्ये सावंत यांचा जन्म झाला. परंतू अभ्यास, वाचन, चिंतन, मनन याच्या बळावर सावंत यांनी वाचकांना खिळवून ठेवणारे असे शब्दवैभव निर्माण केले. आजरा, कोल्हापूर आणि पुणे येथे प्रतिवर्षी त्यांच्या स्मृती जागवल्या जातात.
जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले, आजच्या सोशल मीडीयाच्या प्रभावकाळात आपणच जाणीवपूर्वक वाचनसंस्कृती वाढवणे आवश्यक आहे. ती गोडी लागण्यासाठी ‘मृत्युंजय’सारखी कादंबरी हाती घ्यावी लागेल.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, सावंत हे जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम शाळेमध्ये टायपिंगचे प्रशिक्षक हाेते हे ऐकून मला अभिमान वाटला. ‘छावा’ चित्रपटामुळे त्यांची देशभर ख्याती झाली.
यावेळी राम देशपांडे, प्राचार्य जी. पी. माळी, सौम्या तिरोडकर, विश्वास सुतार, प्रा. दीपक जोशी,अरविंद राणे, कल्पना सावंत संजीवनी देशपांडे, स्नेहल कामत यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.




