महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र, भाजपविरुद्ध लढणार 'या' शहारातून झाली सुरूवात..?

महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र, भाजपविरुद्ध लढणार 'या' शहारातून झाली सुरूवात..?

मुंबई - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली असली तरी, मनसेचा अधिकृतपणे महाविकास आघाडीत समावेश होण्याची शक्यता अद्याप धूसर आहे. दरम्यान, नाशिकमध्ये मात्र मोठी राजकीय घडामोड घडली आहे. नाशिकमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढवणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.

राज्यात मनसे अजून महाविकास आघाडीत अधिकृतपणे सामील झालेली नसताना, नाशिकमध्ये भाजपला रोखण्यासाठी ही युती करण्यात आल्याचं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका अद्याप निश्चित नसली तरी, नाशिकमधील काँग्रेस आणि मनसेचे स्थानिक नेते एकत्र पत्रकार परिषदेत उपस्थित राहिले.

मनसे नेते दिनकर पाटील यांनी सांगितले की, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही आघाडी आवश्यक आहे. देशात मत चोरीवर सरकार आले आहे आणि 96 लाख दुबार मतदार असल्याचं पुढे आलं आहे. आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोबत नाशिकमध्ये गुन्हेगारीविरोधात मोर्चा काढला होता. मनसे हा केवळ पक्ष नाही, तर जनतेचा आवाज आहे आणि हा आवाज आता महाविकास आघाडीसोबत नाशिकभर घुमणार आहे असं त्यांनी म्हटलं.

काँग्रेसचे नेते राहुल दिवे यांनी या संदर्भात स्पष्ट केलं की, या युतीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल आणि जो निर्णय वरिष्ठांकडून येईल, तो आम्ही मान्य करू. त्यामुळे महाविकास आघाडी आणि मनसेच्या संभाव्य राज्यस्तरीय युतीबाबत काँग्रेसची भूमिका काय असेल, हे आता पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

नाशिकमधील या घडामोडीनंतर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.