राजे फाउंडेशन व राजे बँकेच्या आरोग्य शिबिरात ११७० नागरिकांची झाली मोफत तपासणी

राजे फाउंडेशन व राजे बँकेच्या आरोग्य शिबिरात ११७० नागरिकांची झाली मोफत तपासणी

कागल (प्रतिनिधी): राजे बँक व राजे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ११७०  नागरिकांची तपासणी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच शाहू कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदितादेवी घाटगे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी शिबीरस्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत आरोग्याबाबत जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

       या शिबिरात डोळे, हृदयविकार, मूत्रविकार, अस्थिविकार, जनरल तसेच स्त्रीरोग अशा विविध विभागांमध्ये मोफत तपासणी करण्यात आली. अथायु, कोल्हापूर ऑर्थोपेडिक सेंटर, आकाशदीप नेत्रालय, मोरया हॉस्पिटल, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, ग्रामीण रुग्णालय तसेच संकल्पसिद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कागल येथील तज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात सेवा दिली.

        यावेळी रक्तदाब, ईसीजी व शुगर तपासणी मोफत करण्यात आली. तसेच अँजिओग्राफी, टीएमटी व टू डी इको तपासण्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या. विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांची विविध तपासणीही मोफत करण्यात आली.